जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेच्या दक्षता पथक क्र-2 ने मुंब्रा खाडीत अतिशय धाडसी अशी कारवाई केली. या कारवाईत 1 बार्ज त्यात पाणी शिरल्याने जागीच बुडाले तर उरलेले 2 बार्ज आणि 4 सक्षण… पंप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्या तात्काळ पोलिसांकडे पुढील तपासाकरिता सोपविण्यात आल्या, अनधिकृत रेती उपसा करणाऱ्या सेक्शन पंप बार्ज वर कारवाई करण्याची धडक मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढेही अशा प्रकारे अनधिकृतपणे रेती उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाया सुरुच राहतील, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.