राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ३७ हजार ३६२ प्रकरणे निकाली – एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख रूपयांची यशस्वी तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ३७ हजार ३६२ प्रकरणे निकाली निघाली असून याद्वारे एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख १२ हजार रूपयांची तडजोड यशस्वी झाली आहे. न्यायालयातील वाढता ताण लक्षात घेता प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आवश्यक असून राष्ट्रीय लोकअदालतमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याने पक्षकारांस तात्काळ न्याय मिळतो आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होतो, प्रलंबित २० हजार २३८ प्रकरणे निकाली निघाली, अशी माहिती सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली. राष्ट्रीय लोकअदालत हा लोकांच्या समस्या सोडविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. मोटार अपघातांच्या ३८२ प्रकरणांमध्ये तडजोड होवून ३५ कोटी ०९ लाख २९ हजार रूपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ठाणे मुख्यालयातील एका मोटार अपघात दाव्यामध्ये रक्कम रू.६५ लाख आणि एका प्रकरणात ६० लाख रूपये अशा दोन प्रकरणांत उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडीतांना मंजूर करण्यात आली आहे. या लोकअदालतील १५९ वैवाहिक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. ठाणे महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेच्या थकित कराची वसूलीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिल्हयात एकूण ३७ हजार ३६२ प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. याद्वारे एकूण एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख १२ हजार रूपयांची तडजोड यशस्वी झाली. त्यापैकी २० हजार २३८ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांत रक्कम २ अब्ज ३७ कोटी ७९ लाख ८५ हजार इतक्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. दाखलपूर्व १७ हजार १२४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांत रक्कम ५० कोटी २३ लाख २६ हजार इतक्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या १५ हजार ८५६ फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुली करण्यात आली. या लोकअदालतमध्ये प्रथमच Debts Recovery Tribunal (DRT) प्राधिकरणाद्वारे २८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून एकूण तडजोडीची रक्कम रू.१ अब्ज २७ कोटी १५ लाख ६४ हजार इतकी आहे. या लोकअदालतीमध्ये किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास १५ हजार ८५६ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम जमा केली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये बेलापूर न्यायालयाद्वारे ई-फायलिंग प्रणालीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याचा यशस्वी प्रयोग केला. यामध्ये प्रकरण दाखल करण्यापासून ते निकाली निघेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदपत्राशिवाय ई-प्रणालीने करण्यात आली असून एकूण १७१ प्रकरणे ई-प्रक्रियेने निकाली निघालेली आहेत. जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १० ते १५ वर्ष जुनी असंख्य प्रकरणे निकाली काढण्यात आली. वैवाहिक प्रकरणांमध्ये तडजोडीस मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून एकूण १५९ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली असून यामुळे अनेक संसार पुन्हा जुळले. दाखलपूर्व बँक रिकव्हरी ची एकूण ४५४ प्रकरणे निकाली निघाली असून ३ कोटी ०६ लाख ५५ हजार इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. एन. आय. अॅक्ट कलम १३८ ची १ हजार ४५० प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असून तडजोडीची रक्कम २६ कोटी ७४ लाख इतकी आहे. प्रॉपर्टी टॅक्स / रेव्हेन्यू ची दाखलपूर्व ६ हजार ५९० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून तडजोडीची रक्कम ३७ कोटी ०५ लाख इतकी आहे. पाणीपट्टीची दाखलपूर्व २ हजार ६९० प्रकरणे निकाली निघाली असून एकूण तडजोडीची रक्कम १ अब्ज ८२ लाख ८४ हजार इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क, ठाणे अंतर्गत निरीक्षक कार्यालयातील एकूण ७४ केसेस मध्ये दोषसिध्दीचे निकाल दिले असून एकूण रक्कम १८ लाख ४१ हजार इतक्या रकमेचा दंड आरोपितांकडून जमा करण्यात आलेला आहे. याशिवाय या लोकअदालतीमध्ये कारागृहातील न्यायाधीन बंदयांची प्रकरणे ठेवून कारागृहातील न्यायाधीन बंदींपैकी जवळपास २१ बंदयांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading