पूर्व द्रूतगती महामार्गावर गोल्डन डाईज नाका येथे उभारलेल्या राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. ठाण्यात गोल्डन डाईज नाका येथे १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला होता. त्याचं थाटात उद्घाटनही झालं. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा राष्ट्रध्वज जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळं राष्ट्रध्वजाच्या संदर्भात निश्चित केलेल्या आचारसंहितेचा अवमान होत आहे. यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीची निगा आणि देखभाल करण्याची जबाबदारी आहे. मात्र ही कंपनी आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळं महापालिका प्रशासनानं राष्ट्रध्वज बदलण्याबाबत केलेल्या संहितेनुसार तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी महापौरांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.