कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७४ पोलीसांच्या वारसांना पोलीस सेवेतील नियुक्तीची पत्रं पोलीस महासंचालकांच्या हस्ते काल देण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालयात ज्या पोलीस अंमलदारांचे करोना कालावधी आणि तत्पूर्वी पोलीस सेवेत असताना निधन झाले आहे अशा पोलीस अंमलदारांच्या पाल्यांची अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलामध्ये निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्याप्रमाणे काल पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते 74 पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पोलीस पाल्याना अनुकंपा तत्वावर प्रत्यक्ष पोलीस महासंचालकांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याचा शहर पोलीस कल्याण विभागाअंतर्गत आयोजित केलेला राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. हेमंत नगराळे यांनी राज्यभरात अशा प्रकारे उपक्रम राबविण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. करोना कालावधीत ज्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी विशेष योगदान दिले आहे अशांना करोना योद्धा म्हणून विशेष पोलीस पदक देवून गौरव करण्याविषयी शासनास प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले. या काहीशा भारावलेल्या आणि प्रेरणादायक कार्यक्रमात अल्प कालावधीत ही नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी संबधितांचे कौतुक केले.