किन्नर हा समाजातील उपेक्षित घटक राहू नये तसंच हा समाज स्वावलंबी व्हावा यासाठी भविष्यात महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतील तसंच पालिका रूग्णालयांमध्येही या समाजाला माफक दरात उपचार मिळावे यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं. किन्नरांच्या उन्नतीसाठी महापौरांनी पुढाकार घेऊन समाजातील अतिशय उपेक्षित अशा घटकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल काल किन्नर समाजातील प्रतिनिधींनी महापौरांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले त्यावेळी महापौरांनी हे प्रतिपादन केलं. किन्नरांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, आरोग्य शिबीर, जनजागृती कार्यक्रम तसंच किन्नर व्यक्तीच्या उदरनिर्वाहासाठी प्रति लाभार्थी १८ हजार रूपये अनुदान देणं अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे. या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित अधिका-यांना महापौरांनी सूचना केल्या. किन्नर समाजासाठी योजना राबवणारी ठाणे महापालिका ही पहिली महापालिका असल्याचं महापौरांनी सांगितलं. आजवर दुर्लक्षित असलेल्या किन्नरांसाठी महापौरांनी उचललेल्या महत्वपूर्ण पावलांमुळे भविष्यात किन्नरांचा विकास होईल अशी आशा व्यक्त करून किन्नर समाजाच्या प्रतिनिधींनी महापौरांचे आभार मानले.
