मराठी माणसाला उद्योग व्यवसाय सुरू करताना आपल्याच माणसाकडून जास्त त्रास होतो. आपण नोकरीच करावी असं त्याला वाटतं. व्यवसाय सुरू करताना स्वत:चं भांडवल नसतं म्हणून सुरूवात छोट्या व्यवसायाने करा. हवी तर टपरी टाका तरच भविष्यात फॅक्टरी उघडाल असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक नामदेव जाधव यांनी केलं. दिवाळीच्या निमित्तानं ठाण्यातील उद्योजकांच्या भेटीचा कार्यक्रम मराठा बिझनेस फोरमच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जाधव बोलत होते. रेराचा खूप चांगला परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. तेजी मंदीला सर्वच व्यवसायांना तोंड द्यावं लागतं. मात्र भविष्यात घर बांधणी उद्योगाचा परीघ मोठा होणार असून यात काम करण्याची संधी छोट्या-मोठ्या उद्योजकांना देखील असेल असं मत निर्माण ग्रुपच्या राजेंद्र सावंत यांनी व्यक्त केलं. आपल्या लोकसंख्येच्या ६५ टक्के भाग हा तरूणांचा आहे. सर्वात जास्त संधी ही सेवा क्षेत्रात असून या संधी हेरून तरूणांनी त्या मिळवल्या पाहिजेत असं प्रोजेक्ट कन्सल्टंट रितेश सावंत यांनी सांगितलं. सतत आपल्या व्यवसायाचा विचार आणि कृती करणे आणि कोणाशीही स्पर्धा न करता फक्त स्वत:शीच स्पर्धा केली तर यश हे आपलंच असतं असं यशाचं गमक कथन करताना प्रशांत कॉर्नरच्या प्रशांत सकपाळ यांनी सांगितलं.
