खाडी किनारी रोहित पक्ष्यांचे थवेच्या थवे

ठाण्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावांसोबत विस्तीर्ण खाडी किनारा अशा नैसर्गिक विविधतेमुळे ऋतुमानानुसार शहरात अनेक पक्षी येत असतात. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्ष्यांचं ठाण्यात आगमन झालं आहे. तब्बल दोन अडीच महिन्यांचा हजारो किलोमीटरचा प्रवास करून सध्या रोहित पक्षी ठाणे खाडी परिसरात दाखल झाले आहेत. थंडीची चाहूल लागली की ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीत रोहित पक्ष्यांचे थवेच्या थवे खाडी किनारी दाखल होतात. लाल बूंद चोच, लांबसडक मान, ऊंच पाय असे त्यांचे रूप असल्यामुळं त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. हजारोंच्या संख्येनं दाखल झालेल्या या रोहित पक्ष्यांच्या पाण्यामधील शिस्तबध्द हालचाली अनेकदा नेत्रसुखद असतात. भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्राही मनाला मोहवून टाकतो. त्या पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत असल्यानं त्यांच्या पाण्यात कवायती चालल्याचा भास होतो. सध्या खाडी किनारा परिसरात सिंगल, राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या, तुतवार तापस अशा विविध जातींचे पक्षी सध्या खाडी किनारी दिसत आहेत.

 

Leave a Comment

%d bloggers like this: