दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुबई सिटी स्वीम २०१८ जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे. दुबईतील काईट बीच येथे झालेल्या या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंनी अडीचशे आणि पाचशे मीटर स्पर्धेत २ सुवर्ण, ४ रौप्य तर ३ कांस्य तसंच वैयक्तीक विजेतेपद पटकावत दुबईमध्ये ठाण्याचं नाव चमकवलं. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध २८ देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् क्लबच्या वतीनं ८ जलतरण पटू सहभागी झाले होते. अडीचशे मीटर स्पर्धेत नील वैद्यनं सुवर्ण, वेदांत गोखलेनं रौप्य तर आरूष सुर्वेनं कांस्य पदक पटकावलं. शांता आणि कैलास आखाडे यांना प्रत्येकी १ कांस्य पदक मिळालं. ५०० मीटर जलतरण स्पर्धेत नील वैद्यनं सुवर्ण, वेदांत गोखलेनं रौप्य तर आरूष सुर्वेनं रौप्य पदक पटकावलं. आयुषी आखाडेला १ रौप्य पदक मिळालं. या स्पर्धेत कुंज शहा, तीर्थ शहा, विजय ओजाळे हे जलतरण पटूही सहभागी झाले होते. दुबईत विशेष कामगिरी करत ठाण्याच्या नावलौकीकात भर टाकणा-या या जलतरण पटूंचं आमदार निरंजन डावखरे यांनी खास दुबईमध्ये जाऊन कौतुक केलं.
