सिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी

ठाण्यातील सिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी दिवाळीच्या मुहुर्तावर होणार आहे. अक्षर साक्षरतेनंतर विज्ञान साक्षरता दृढ व्हावी यासाठी १०० हून अधिक प्रयोगांनी सज्ज असलेली मुक्त प्रयोगशाळा, बँकींग व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली वास्तवातील बँक, तीन हात नाक्या व्यतिरिक्त इतर सिग्नलवरील मुलांना सामावून घेण्यासाठी उभारण्यात आलेली अत्याधुनिक नवी वर्ग खोली अशा पायाभूत सुविधांचा शुभारंभ शनिवारी होणार आहे. मो. ह. विद्यालयाच्या १९६९ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून सिग्नल शाळेत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत चौथी ते दहावीच्या अभ्यासक्रमातील तसंच अभ्यासक्रमाबाहेरील १०० हून अधिक प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. शाळेच्या वेळेनंतर सिग्नलवर वस्तू विकल्यावर गाठीशी आलेले पैसे बचत करण्याची सवय लागावी यासाठी आणि प्रत्यक्ष बँकींग व्यवहार कळावेत म्हणून सिग्नल शाळा ठाणे जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने शाळेत सुरू होत आहे. इतर सिग्नलवरील मुलांना शाळेत सामावून घेण्यासाठी अत्याधुनिक अशी डिजीटल वर्ग खोली सिग्नल शाळेत उभारण्यात आली आहे. या तिन्ही सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी होणार आहे. याबरोबर सिग्नल शाळेचा दीपोत्सव देखील साजरा होणार आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: