ठाणे शहराच्या धरणासाठी ठाणेकरांनी एक होण्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

ठाणे शहराला पाणी देण्यासाठी धरणाची आवश्यकता असून त्यासाठी तहानलेल्या ठाणेकरांनी एक व्हा, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे तीव्र चटके ठाण्याला बसू लागले असतानाच शहापुरात धरण बांधून त्याचे पाणी अहमदनगरला नेण्याची योजना नितीन गडकरी यांनी मांडली आहे. ठाणे जिल्हा तहानलेला असताना ठाण्याची तहान भागवण्याऐवजी ठाण्याच्या वाट्याचे पाणी इतरत्र नेण्याऐवजी आमची तहान भागवा आम्ही अप्पलपोटे नाहीत, आम्ही इतरांनाही पाणी पाजू, असे म्हणत ठाणे शहराला पाणी देण्यासाठी धरणाची आवश्यकता असून त्यासाठी तहानलेल्या ठाणेकरांनी एक व्हा, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. संपूर्ण जिल्हा आज तहानलेला आहे. आतापर्यंत ठाण्याने मुंबईची तहान भागवली आहे. अनेक धरणे मुंबईला पाणी पुरवठा करत आहेत. पण ठाणेच तहानलेले आहे. जिल्ह्यातील अनेक वस्त्या, आदिवासी वाडे-पाडे, गावे तहानलेले आहेत. शहापूर तालुक्यातून सर्वात जास्त पाणी मुंबईला पुरवले जाते तिथेही पाणी टंचाई आहे. ठाणे शहराचे बोलायचे झाले तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शाई धरण आजही पूर्ण होण्याच्या मार्गावर नाही. आजही जिल्हयातील 90 टक्के धरणाचा वापर ठाण्यासाठी होत नाही. जलनियोजनासाठी तसेच जलवहनासाठी 5 हजार कोटी रुपयांचा खर्च करीत असेल तर त्याआधी पाण्याचे साठे जीवंत ठेवण्यासाठीही खर्च करा. पाण्याचे वहन करणे की पाण्याचे साठे जीवंत ठेवणे, यात प्राधान्य कशाला द्यावे हे त्यांनी तपासून घ्यावे. आपण पाणी कोणालाही पाजा, आमचे काही म्हणणे नाही. पण आमची तहान तर भागवा; ठाणेकरांचे हक्काचे पाणी आधी ठाणेकरांना द्या, ठाण्याला लागणा-या धरणासाठी खर्च करा. तहानलेल्या ठाणेकरांनी एक व्हायला हवं. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सांगायला हवं की जिल्ह्यातील नागरिकांनी कायमच मुंबईसह उभ्या महाराष्ट्राची तहान भागवली आहे. आज मात्र पूर्ण जिल्ह्यामध्ये पाण्याचा खडखडाट आहे. आतापासून एक दिवस ठाण्यात पाणी कपात केली जाणार आहे. म्हणजेच पाण्याची टंचाई ठाणेकरांना भासत असताना, ठाण्याच्या तोंडचं पाणी पळवू नका अशी विनंतीही आमदार आव्हाड यांनी केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: