वाहनाचा परवाना अथवा वाहनाची कागदपत्रं जवळ बाळगण्याची आता चिंता मिटली

वाहनाचा परवाना अथवा वाहनाची कागदपत्रं आता जवळ बाळगण्याची चिंता मिटली असून डिजीटल लॉकर अथवा एम परिवहन ॲपमध्ये असलेली कागदपत्रं अधिकृत मानली जाणार आहेत.केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं याबाबत परिपत्रक जारी केलं असून एखाद्या प्रकरणात वाहन परवाना अथवा गाडीची कागदपत्रं तपासायची असल्यास डीजीटल लॉकरमधील कागदपत्रं मूळ कागदपत्रांप्रमाणेच ग्राह्य धरावीत असं म्हटलं आहे. मोटार वाहन कायदा १९८८ आणि आयटीआय २००० या कायद्यानुसार ही कागदपत्रं अधिकृत मानली जाणार आहेत.  वाहनांची कागदपत्रं जवळ बाळगण्यापेक्षा डिजीटल लॉकर अथवा एम परिवहन ॲपमधील कागदपत्रं अधिकृत मानावीत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक मंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय झाला आहे. केंद्राच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं डिजीटल लॉकर प्लॅटफॉर्मची निर्मिती केली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रमाणपत्रं इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळं आता या परिपत्रकानुसार डिजीटल लॉकरमधील कागदपत्रं ही त्यांच्या मूळ कागदपत्रासारखीच कायदेशीररित्या अधिकृत मानली जाणार आहेत. केंद्रानं सर्व राज्य सरकारांना याबाबत पत्र पाठवलं असून ही कागदपत्रं ग्राह्य धरावीत असं म्हटलं आहे. त्यामुळं रोज वाहन चालवताना ही कागदपत्र घेऊन फिरण्याची आवश्यकता आणि चिंता आता संपली आहे. मात्र याबरोबरच लायसन्स अथवा कागदपत्रं विसरलो अशी सबबही वाहन चालकांना सांगता येणार नाही.

Leave a Comment

%d bloggers like this: