crime

शालेय प्रवेशासाठी मुलीची प्रमाणपत्रं घेण्याकरिता सासरी आलेल्या सूनेवर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धक्कादायक घटना

शालेय प्रवेशासाठी मुलीची प्रमाणपत्रं घेण्याकरिता सासरी आलेल्या सूनेवर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धक्कादायक घटना रघुनाथनगरमध्ये घडली आहे. दक्षा मंगे असं या पिडीत महिलेचं नाव असून ७० टक्के भाजल्यानं तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. रघुनाथनगरमधील वालदास आशिष सोसायटीतील अशोक मंगे यांच्याशी दक्षाचा विवाह झाला होता. विवाह झाल्यापासूनच पती अशोक आणि सासू जमनाबेन यांच्याकडून क्षुल्लक कारणावरून मानसिक आणि शारिरीक छळ तसंच मारहाणही केली जात असे. या त्रासाला कंटाळून अडीच महिन्यापूर्वी दक्षा माहेरी रहायला गेली होती. दक्षाच्या मुलीच्या शाळेच्या प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्रं सासरी असल्यानं ती शुक्रवारी सासरी आली होती. तेव्हा मुलीच्या प्रमाणपत्राची मागणी केल्यावर तिची सासू जमनाबेन हिनं दक्षाला स्वयंपाकघरात ओढत नेऊन तिच्यावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. दक्षा आणि तिच्या मुलीनं जोरजोरात ओरडाआरड केल्यानं शेजारी-पाजारी जमा झाले. त्यांनी ७० टक्के भाजलेल्या दक्षाला नजिकच्या रूग्णालयात दाखल केलं. पोलीसांनी दक्षाचा पती अशोक आणि त्याची आई जमनाबेन या दोघांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *