क्लस्टरच्या अंमलबजावणीवर सर्वपक्षीय सहमतीचे शिक्कामोर्तब क्लस्टरविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी घेणार पुढाकार गावठाण-कोळीवाडेही क्लस्टरमध्ये सहभागी होवू शकतात- आयुक्त

क्लस्टर योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही देत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी क्लस्टर योजना राबविण्याच्या घेतलेल्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीला पाठिंबा व्यक्त करत या योजनेवर शिक्कामोर्तब केले. या योजनेमधून सद्यःस्थितीत जुने गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आले असले तरी त्यांनी लेखी संमती दर्शविल्यास त्यांचाही क्लस्टरमध्ये समावेश करता येईल अशी सकारात्मक भूमिका घेवून ही योजना नागरिकांची फसवणूक करणारी नाही तर शहराच्या विकासाची असल्याचे मत व्यक्त करून या योजनेची माहिती देण्यासाठी आपण स्वतः नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या क्लस्टर योजनेची माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वपक्षीय नगरसेवक, वास्तुविशारद आणि विकासक यांची विशेष बैठक आज नागरी संशोधन केंद्र येथे आयोजित केली होती.यावेळी बोलताना महापालिका आयुक्तांनी शासनाच्या धोरणानुसार तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून ही योजना सर्वसमावेश आणि नागरिकांच्या फायद्याची राहिल अशीच प्रशासनाची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र याबाबत नागरिकांमध्ये नाहक गैरसमज पसरविण्याचे काम सुरू असून हे गैरसमज दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे बोलून दाखविले. यावेळी त्यांनी आपण स्वतःही या योजनेची माहिती देण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बहुतांशी नगरसेवकांनी जुने गावठाण आणि कोळीवाडे यांचा या योजनेमधील सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना  जयस्वाल यांनी सद्यस्थितीमध्ये जुने गावठाण आणि कोळीवाडे या योजनेतून वगळण्यात आले असले तरी संबंधितांकडून लेखी संमती मिळाली तर जुनी गावठाणे आणि कोळीवाडे या योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेता येईल असे सांगितले.

या योजनेची अंमलबजावणी करताना सीआरझेड, बफर झोन, ग्रीन झोन या सर्वांचा विचार केला असून कुठल्याही नियमाची पायमल्ली होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे असे सांगून ही योजना नागरिकांच्या भल्याची योजना आहे. नागरिकांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही यासाठी प्रशासन बांधील आहे असे सांगितले.

या योजनेची पात्रता निश्चित करणे, लाभार्थ्यांच्या अनुज्ञेय क्षेत्राफळाबाबत निर्णय घेणे, तसेच त्यांचे पुनर्वसन करणे याबाबत बोलताना आयुक्तांनी  कमीतकमी तोडफोड आणि जास्तीत जास्त पुनर्वसन करण्यावर प्रशासनाचा भर असून वन विभागाच्या जागेत राहणा-या लोकांचेही पुर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करताना 2014 पर्यंतचा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार असून अनधिकृत बांधकामांच्याबाबतीत मालकी हक्क प्रस्थापित होणार नसला तरी अशा इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांचे 30-30 वर्षांच्या नियमाने 90 वर्षांचे लीज करण्यात येणार असल्याने अनधिकृत इमारतींमध्ये किंवा अनधिकृत जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही या योजनेमध्ये संरक्षण देण्यात आले असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सदरची योजना ही लोकप्रतिनिधींची योजना असून त्याला महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ज्या नेटाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहिर केले.  येत्या 1 जानेवारीपासून कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर, लोकमान्यनगर आणि टेकडी बंगला या सहा ठिकाणाच्या योजनांचे सर्वेक्षण सुरू होत असून नागरिकांनी त्याला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या बैठकीच्या निमित्ताने केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading