​उद्या प्रदोषकाळात सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत लक्ष्मीकुबेर पूजन कराव – पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

आज चतुर्दशी आहे. चतुर्दशी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. त्यामुळे चतुर्दशी ‘ क्षयतिथी ‘ आहे. त्यामुळे आज दिवाळीतील कोणताही सण नाही. उद्या गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी  नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन आहे. नरकचतुर्दशी ही आश्विन कृष्ण चतुर्दशी चंद्रोदय व्यापिनी हवी. उद्या पहाटे ५-४९ वाजता चंद्रोदय आहे आणि पहाटे ६-०४ वाजता आश्विन कृष्ण चतुर्दशी संपते म्हणून उद्या नरकचतुर्दशी आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस ठरविण्यासाठी नियम असा आहे की ज्या दिवशी प्रदोषकाली आश्विन अमावास्या असेल त्या दिवशी प्रदोष कालात लक्ष्मीपूजन करावे. उद्या सकाळी ६-०४ पासून उत्तररात्री २-४५ पर्यंत आश्विन अमावास्या आहे. उद्या सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत प्रदोषकाल आहे. उद्या प्रदोषकाळात आश्विन अमावास्या असल्याने उद्याच प्रदोषकाळात सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत लक्ष्मीकुबेर पूजन करावयाचे असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. उद्या नरक चतुर्दशी असल्यामुळे चंद्रोदयापासून म्हणजे पहाटे ५.४९ पासून सूर्योदयापर्यंत म्हणजे सकाळी ६.४१ पर्यंत अभ्यंगस्नान करावयाचे आहे. शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे. यालाच ‘ अभ्यंगस्नान ‘ असे म्हणतात. दिवाळीचे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात.त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. दिवाळीच्या या  दिवसात रोज अभ्यंगस्नान करावयाचे आहे.  नरक चतुर्दशी संबंधी पुराणात एक कथा सांगितलेली आहे. नरकासुराला भूदेवीकडून ‘ वैष्णवास्त्र ‘ प्राप्त झाले होते. त्यामुळे तो बलाढ्य आणि उन्मत्त झाला होता. त्याला गर्व झाल्याने त्याने सर्व देवाना त्रास देण्यास सुरुवात केली. इंद्राचा ऐरावतही त्याने पळविला. अनेक राजांच्या आणि नागरिकांच्या एकूण सोळा हजार मुली त्याने पळवून आपल्या बंदिवासात ठेवल्या होत्या. नरकासुराच्या अत्याचारामुळे सर्वच लोक गांजले होते. त्यामुळे इंद्राने भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करून त्याला ठार मारले.ही गोष्ट आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी घडली.मरतेसयी नरकासुराने भगवान श्रीकृष्णाकडे  वर मागितला, आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये. तसेच माझा हा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा. नरकचतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी नरकासुर म्हणून कारेट्याचे कडू फळ पायाखाली दाबून चिरडण्याची प्रथा आहे. आजही समाजात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगीरी, अस्वच्छता, अनीती इत्यादी नरकासुर थैमान घालीत आहेत. त्याना नाहिसे करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेणार नाही. आपल्या प्रत्येकालाच श्रीकृष्ण बनून त्यांचा नाश करून समाजाला सुखी करावयाचे आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading