स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास सयाजी गायकवाडांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही-प्रा. बाबा भांड

महाराजा सयाजीराव हे प्रज्ञावंत राजे होते, त्यांनी समाजसुधारणा, दुष्काळ निवारण, शिक्षण इ. क्षेत्रामध्ये कालातीत कायदे केले. त्यांनी अनेक महापुरूषांना, स्वातंत्र्यसेनानींना मदत केली. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास पुर्ण होवू शकणार नाही असे प्रतिपादन करीत महाराष्ट्र सरकार सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ग्रंथ स्वरुपात प्रकाशित करून त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आणते आहे याचे मनस्वी समाधान वाटते असे वक्तव्य ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक बाबा भांड यांनी ठाण्यात केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक प्रा. बाबा भांड यांनी रसिकांसमोर उलगडला. यावेळी महापालिका आयुक्तांनी पुस्तके भेट देवून प्रा. भांड यांचा सन्मान केला. प्रा. भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचे, पुरोगामी विचारसरणीचे अनेक दाखले सादर करत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अनेक क्रांतीकारकांना मदत केली, त्यांनी त्यावेळी सुमारे 89 कोटींच्या (आजच्या काळानुसार सुमारे 2 लाख 90 हजार कोटींच्या) शैक्षणिक शिष्यवृत्या दिल्या. त्यांनी अनेक पुरोगामी कायदे केले, त्यांनी केलेले कायदे हे तत्कालीन युरोप आणि अमेरिकेच्या पुढे होते, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही नमूद केले होते. महाराजा सयाजीराव यांनी जात, पात, धर्माच्या भिंती पाडल्या, त्यांनी पुरोहितांसाठी कायदा केला होता, दुस-या धर्म परिषदेचे ते अध्यक्ष होते, वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही अधिकार असल्याचा कायदा त्यांनी त्यावेळी केला, संन्यास घेण्यासाठीही कायदा केला, अशा अनेक अद्भभूत गोष्टी महाराजा सयाजी गायकवाड यांनी केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना बाबा भांड म्हणाले, हिंदुस्थानातील एकमेव सार्वभौम राजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा अद्भुत प्रवास भारतीय इतिहासातील दडलेले एक सोनेरी पानच आहे. शिक्षण हेच प्रगती परिवर्तनाचे एकमेव साधन आहे या जाणिवेतून सयाजीराव प्रत्येक गोष्ट चिकाटी आणि जिद्दीने शिकत गेले. ग्रंथवाचन हे शिक्षण ओळखीचे एक अंग आहे, हे ओळखलेल्या तरुण राजांची ग्रंथांशी मैत्री वाढत गेली. आयुष्यभर नव्या गोष्टी सयाजीराव चिकाटीने शिकत गेले. जनकल्याण आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांनी तरूणपणीच जगभरातील प्रशासन पध्दतीचा अभ्यास केला. अस्पृश्य आदिवासी मुलांसाठी सरकारी खर्चाने निवासी शाळा सुरू केल्या. हिंदुस्थानातील अस्पृश्योद्धाराची पायाभरणी केली. तसेच राज्यातील मुलामुलींसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सयाजीरावांनी सुरु केले. सुप्रशासन, न्याय, शेतीउद्योगांना मदत, सामाजिक, धार्मिक सुधारणा, जाती-धर्मातील भेद दूर करत मानवता आणि सर्वधर्म समभावाचा मार्ग निवडत सयाजीराजा गायकवाड यांनी भारतात अनेक क्षेत्रात आपले वेगळेपण दाखवून दिले असल्याचे बाबा भांड यांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading