सिव्हिल रुग्णालयात लहान मुलांसाठी दोन व्हेंटिलेटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात प्रथमच लहान मुलांसाठी दोन व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे दोन्ही व्हेंटिलेटर प्रदान केले. या व्हेंटिलेटरमुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मुलांना कोरोनाबरोबरच अन्य आजारांसाठी उपचार होण्यास मदत होईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी सिव्हिल रुग्णालयातील सुविधांची माहिती घेतली होती. त्यावेळी त्यांना लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने आमदार निधीतून दोन व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फिलिप्स कंपनीचे दोन दर्जेदार आणि अद्ययावत व्हेंटिलेटर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आले. ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच पालघर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सिव्हिल रुग्णालयाकडून चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले. आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना आवश्यक उपचारांसाठी व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले आहेत. त्याचा जिल्ह्यातील मुलांना फायदा होईल. विशेषत: या व्हेंटिलेटरमध्ये लहान मुलांबरोबरच प्रौढ व्यक्तींच्याही उपचाराची सुविधा आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना व्हेंटिलेटरचा वापर होईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल रुग्णालयातर्फे मनोरुग्णालयातील इमारतीत लहान मुलांसाठी अद्ययावत कक्ष उभारला जात आहे. या कक्षासाठी दोन्ही व्हेंटिलर उपयुक्त ठरतील, अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. कोरोना रुग्णांबरोबरच कमी वजनाची मुले, न्युमोनिया झालेल्या मुलांसाठीही व्हेंटिलेटरचा वापर करता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading