सिनेनाटय अभिनेता शरद पोंक्षे यांना जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार तर सिने-नाट्य अभिनेत्री उषा नाईक यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्कार जाहिर

प्रसिध्द सिनेनाटय अभिनेता शरद पोंक्षे यांना जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार तर गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणा-या प्रसिध्द सिने-नाट्य अभिनेत्री उषा नाईक यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी ही घोषणा केली. दरम्यान साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल प्रशांत डिंगणकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल बाळासाहेब खोल्लम तर लक्षवेधी कलावंत माधुरी करमरकर यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणा-या जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह समारंभामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.दरवर्षी ठाणे महानगरपालिका व जनकवी पी.सावळाराम कला समिती यांच्यावतीने संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय, कला आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.प्रसिध्द सिने-नाटय अभिनेता शरद पोंक्षे यांना यंदाचा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी चित्रपट आणि नाटय क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्य सृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. अथांग, असं झालंच कसं?, उंबरठा, एक दिवस मठाकडे,एका क्षणात, कबिराचे काय करायचे?, कळा या लागल्या जीवा, गंध निशिगंधाचा, गांधी आंबेडकर, तिची कहाणी, तू फक्त हो म्हण, झाले मोकळे आकाश, त्या तिघांची गोष्ट, नटसम्राट, नांदी, बॅरिस्टर, बायकोचा खून कसा करावा?, बेइमान, भारत भाग्य विधाता, मी नथुराम गोडसे बोलतोय, रमले मी, लहानपण दे गा देवा, वर भेटू नका, वरून सगळे सारखे, सुखाने नांदा, सर्वस्वी तुझीच, हाय-राम नथुराम आदी त्यांची नाटके गाजली आहेत. अग्निहोत्र भाग या सारख्या प्रसिध्द मराठी मालिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनय क्षेत्रात दिलेल्या या योगदानाबाबत त्यांना यंदाचा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम रु.51 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रसिध्द अभिनेत्री उषा नाईक यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. पिंजरा, काल रात्री बारा वाजता, सामना, हळद तुझी कुंकू माझे, एक होता विदूषक, दोन बायका फजिती ऐका, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, एक हजाराची नोट, लपवाछपवी, कलावंतीण, माफीचा साक्षीदार, जिंदगी विराट, कॅरी ऑन मराठा, हाफ टिकीट, धोंडी, वंशवेल, देखा प्यार तुम्हारा अशा प्रसिद्ध चित्रपटातून घरा-घरात पोहचलेल्या उषा नाईक यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. रोख रक्कम रु.51 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.साहित्यिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल प्रशांत डिंगणकर यांना तर शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल बाळासाहेब खोल्लम आणि लक्षवेधी कलाकार म्हणून माधुरी करमरकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम रु.21 हजार आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरणाच्या निमित्ताने रंगाई निर्मित जनकवी पी.सावळाराम यांच्या गीतावर आधारीत मानसीचा चित्रकार तो…या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असून रसिकांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading