सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड

ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या सिग्नल शाळा प्रकल्पाची पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे. देशातील ३५ राज्यातील एक हजार प्रयोगांच्या मधून निवडण्यात आलेल्या २०० प्रकल्पांमध्ये सिग्नल शाळेचा प्रकल्प निवडण्यात आला आहे. ठाण्यातील विविध सिग्नलवर व्यवसाय करणारी अथवा भिक्षेकरी असलेली मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावी म्हणून ठाणे महानगरपालिकेने ३ वर्षांपूर्वी समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या सहकार्याने देशातील पहिली सिग्नल शाळा तीन हात नाका सिग्नल पुलाखाली सुरु केली. शाळेच्या ३ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात २ मुले दहावी उत्तीर्ण झाली. जवळपास ४२ मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सिग्नल शाळेचा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा याबाबत विधानसभेत घोषित केले होते. प्रमाणभूत भाषेच्या अडचणी, कुपोषण, अंधश्रद्धा, भटकी जीवनशैली, बालकामगार, आर्थिक अस्थिरता, सामाजिक व सांस्कृतिक अनुशेष या अडचणींवर मात करत गेल्या ३ वर्षात सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्य धारेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांइतपत शैक्षणिक गुणवत्ता धारण केली. केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयासाठी इंडियन सोशल रिस्पॉन्सिबिलीटी नेटवर्क या संस्थेने देशभरातील ३५ राज्यातील एक हजाराहून उपक्रमांचा अभ्यास करुन निवडक २०० प्रकल्प सर्वोत्तम अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून निवडले. या २०० प्रकल्पांमध्ये सिग्नल शाळेची निवड झाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आता सिग्नल शाळेच्या या प्रकल्पाचा समावेश राष्ट्रीय अहवालात केला जाणार असून सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर या प्रकल्पाच्या प्रचार, प्रसिद्धी आणि सक्षमीकरणासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading