सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांना मान्यवरांकडून आदरांजली

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्ता हा सर्व झोकून काम करतो पण या कार्यकर्त्यासाठी मदत, मार्गदर्शन आणि आधार देण्याचे जे काम संजीव साने करायचे त्या कामाचं महत्त्व अमोल आहे. कार्यकर्त्याच्या मदतीसाठी 24 तास तत्पर असलेला हा कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ गेल्यामुळे चळवळीची हानी तर झालीच आहे पण आपला माणूस गेल्याची रुखरुख बोलून दाखवत सर्व उपस्थितांनी संजीव साने यांना श्रद्धांजली अर्पण करताना गहिवरून आठवणी जाग्या केल्या. संजीव साने समाजवादी चळवळीचा चालता बोलता इतिहास होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला राजकीय परिणाम देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, असे कॉ भालचंद्र कांगो यांनी सांगितले तर ठाण्यातील नागरी चळवळ चालवताना अनेक समस्यांवर जन आंदोलन उभारताना नागरी चळवळ राजकीय व्हावी, सामन्यातील सामान्यांनी निवडणूक लढवावी आणि त्या माध्यमातून तज्ञ व्यक्ती लोकप्रतिनिधी व्हावा हे स्वप्न त्यांनी केवळ पाहिले नाही तर गेल्या काही वर्षात जीवाचे रान केले असे ठाणे मतदाता जागरण अभियानाचे अध्यक्ष अनिल शाळिग्राम यांनी सांगितले. विविध संघटना आणि पक्षांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. संजीवने केवळ मार्गदर्शन केले नाही तर कार्यकर्ता खंबीरपणे चळवळीतील उभा राहील याची काळजी घेतली असे सांगून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ही चळवळ पुढे नेण्यासाठी संजीव साने हे व्यक्तिमत्त्व समजून घेतले पाहिजे असे सांगितले. जगदीश खैरालिया यांनी ठाण्यातील सफाई कामगारांसाठी केलेल्या लढाईतून संजीव साने यांनी कार्यकर्त्यांची फळी घडविली, ते सांगितले. इंदवी ताई तुळपुळे यांनी आदिवासी मोर्चे ठाण्यात किंवा जागतिकीकरण विरोधी मोर्चे जेंव्हा मुंबईत काढले जायचे तेंव्हा मोर्चा पूर्वी आणि नंतर साने सर्व तयारी करत, याच्या आठवणी जाग्या केल्या. तर उल्का महाजन यांनी संजीव साने हे एक चालते बोलते विद्यापीठ होते, he was man of organization, म्हणजे संघटना बांधणी आणि चळवळ उभारणी यात त्यांचा हातखंडा होता, हेच सूत्र बाळगून त्यांच्या नावे संघटना बांधणी प्रशिक्षण केंद्र उभारणे म्हणजे योग्य श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त केली. कुटुंबियांच्या वतीने मुलगा निमिष आणि अरुण कर्वे यांनी मनोगत व्यक्त करताना अनेक व्यक्तिगत किस्से सांगून साने यांचे अंतरंग दर्शन घडविले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading