साध्या लोकल पूर्ववत होणार-25 तारखे पासुन वातानुकुलित गाड्या रद्

गेल्या काही दिवसांपासून साध्या लोकल बंद करून सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होतो आहे. याच विषयावर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यावर रेल्वे प्रशासन लवकरच तोडगा काढून साध्या लोकल पूर्ववत करेल, असे आश्वासन यावेळी अनिलकुमार लाहोटी यांनी दिले आहे. याप्रसंगी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल, शिवसेनेचे नेते आणि प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या साध्या लोकल एसी लोकलमध्ये बदलण्यात आल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे सुरूवातीला कळवा आणि नंतर बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केले. गर्दीच्या वेळी एक साधी लोकल एसी केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करता येत नाही. त्यांना त्यामागच्या असलेल्या गर्दीच्या लोकलमध्ये शिरून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहे. प्रवाशांचा या संतापाचे उद्रेकात रूपांतर होण्यापूर्वी प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत बुधवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे प्रवाशांची मागणी लक्षात घेता नव्याने साधी लोकल बदलून सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलमुळे सुरू असलेल्या गोंधळावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी केली. गर्दीच्या वेळी सुरू असलेल्या कोणत्याही सध्या लोकल बंद करू नये. त्याचा प्रवाशांच्या गर्दीवर परिणाम होईल, अशी भूमिका डॉ. शिंदे यांनी यावेळी मांडली. त्यामुळे ज्या साध्या लोकल बंद केल्या आहेत त्या पूर्ववत कराव्यात अशी आग्रही मागणी डॉ. शिंदे यांनी केली. सोबतच लोकल सुरू करत असताना पूर्ण लोकल एसी करण्यापेक्षा एका लोकलमध्ये निम्मे डब्बे साधे आणि निम्मे डब्बे एसी करता येतील का याचीही चाचपणी करावी, अशी सूचना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. एसी लोकलचे भाडे कमी करून प्रवाशांना प्रोत्साहन द्या, अशीही सूचना यावेळी त्यांनी केली. यावेळी बोलताना अनिलकुमार लाहोटी यांनी लवकरच साधी लोकल कशी पूर्ववत होईल याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

सोबतच यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा रेल्वे स्थानकातील विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केली. यात कळवा कारशेडमधून निघणारी आणि ठाण्याहून सुटणारी लोकल कळवा स्थानकात थांबवावी, या प्रमुख मागणीचा यात समावेश होता. बदलापूर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या होम प्लॅटफॉर्मचे काम तातडीने पूर्ण करावे, कल्याण स्थानकात पूर्व भागात लोकग्रामच्या दिशेने तिकीट घराजवळ स्वयंचलित जिना आणि स्वच्छतागृह उभारावे, डोंबिवली स्थानकातील स्वच्छता या मागणीचा समावेश होता. यावेळी उपस्थित प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी दिवा स्थानकात फेस्टिव्हल स्पेशल मेल – एक्स्प्रेस गाड्याना थांबा मिळण्यासाठी फलाट क्रमांक सात आणि आठची रुंदी किमान 22 डब्यांपर्यंत वाढवावी ही मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून त्यावर तातडीने निर्णय घेतले जातील, अशी माहिती यावेळी महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading