सात्त्विक स्तोत्र, आरती, श्‍लोक आणि नामजप यांचा संग्रह असलेल्या सनातन चैतन्यवाणी अ‍ॅपचे लोकार्पण

सात्त्विक स्तोत्र, आरती, श्‍लोक आणि नामजप यांचा संग्रह असलेल्या सनातन चैतन्यवाणी अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. सनातन संस्थेच्या सद्गुरु अंजली गाडगीळ यांच्या हस्ते या अॅपचे प्रकाशन करण्यात आले. सध्या धकाधकीच्या जीवनात आणि चालू असलेल्या संकटकाळात अनेकांचा ओढा हा सनातन धर्माकडे वाढतांना दिसत आहे. समाज हा धर्म आणि अध्यात्म यांविषयी जिज्ञासेने पहात आहे. समाजाला शुद्ध आणि योग्य उच्चार, शुद्ध भाषा, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि भावपूर्ण आवाजात म्हटलेले; तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संतांच्या अन् साधना करणार्‍या साधकांच्या सात्त्विक वाणीतून उच्चारलेले चैतन्यदायी ऑडिओ सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी सनातन संस्थेने ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ऑडिओ अ‍ॅप उपलब्ध केले आहे. लॉकडाऊन असल्याने अगदी साधेपणाने आणि ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करत मंत्रोच्चारांच्या गजरात गोव्यातील सनातन आश्रमात याचे प्रकाशन करण्यात आले. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवर सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. मराठी भाषेत असलेले हे अ‍ॅप अन्य भाषांतही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा आणि सात्त्विक स्तोत्र, आरती, श्‍लोक, नामजप आदींचा लाभ करून घ्यावा असे आवाहन अंजली गाडगीळ यांनी या वेळी केले. या ऑडिओ अ‍ॅपमध्ये सात्त्विक पुरोहितांनी म्हटलेली श्रीदुर्गासप्तश्‍लोकी, श्री गणेश अथर्वशीर्ष, श्रीरामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, श्रीकृष्णाष्टक, अगस्त्योक्त-आदित्यहृदय-स्तोत्र आहेत. तसेच संतांनी स्वतः विशिष्ट लयीत म्हटलेले श्रीराम, श्रीकृष्ण, श्री गणेश, श्री दुर्गादेवी, दत्तात्रेय आणि शिव या देवतांचे नामजप आहेत. भावपूर्ण लयीत साधकांनी गायिलेल्या विविध देवतांच्या आरत्यांसह वर्षभरात येणार्‍या विविध सणांच्या वेळी तथा प्रतिदिन म्हणायच्या विविध श्‍लोकांचा समावेशही या अ‍ॅपमध्ये करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading