समूह विकास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या सोमवारी

देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी ऐतिहासिक समुह विकास योजना मूर्त रुप घेत असून या महत्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसंच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर एवढे आहे. या 45 आराखड्यापैंकी अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. 12 मधील नागरी पुर्नरुत्थान योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अनधिकृत इमारतीसह वसाहतीचा टाऊनशीप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प, मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित आणि सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य 323 चौरस फूट मालकी हक्काचे घर, प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा, प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त, दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल – जलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा, पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदी नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने आशियातील सर्वात मोठ्या असणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे. अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत असलेल्या क्लस्टर योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ होत असल्याने अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading