संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवाची परंपरा कायम – फेसबुकच्या माध्यमातून मिळणार दुर्मिळ मैफलींना उजाळा

नोव्हेंबर महिना सुरू झाला की, संगीतप्रेमी ठाणेकरांना वेध लागतात ते संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवाचे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा महोत्सव नाट्यगृहात घेता येणार नाही. महोत्सवाचे यंदाचे 27 वे वर्षे असून या महोत्सवाच्या परंपरेत खंड पडू नये किंबहुना रसिकांचा ‍हिरमोड होवू नये यासाठी गेल्या 25 वर्षातील दुर्मिळ अशा वैशिष्ट्यपूर्ण स्मरण मैफलीचा आनंद रसिकांना फेसबुकच्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. सगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवात गेल्या 26 वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली हजेरी लावली. प्रात्याक्षिक मैफिल्, संगीत नाटकं, तत्कालीन काळानुरूप विशेष कार्यक्रम हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ठाणेकरांसाठी सांगितिक मेजवानी ठरलेल्या या महोत्सवाचा लाभ ठाण्यासह जगभरातील रसिकांना घेता यावा यासाठी ‘पंडित राम मराठे संगीत महोत्सव’ या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. दरवर्षी ठरलेल्या तारखांना म्हणजेच 28 नोव्हेंबर ते 1 ‍डिसेंबर या कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण अशा स्मरण मैफलीच्या पुन:प्रत्ययाचा आनंद रसिकांना पुन्हा मिळणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. पं. भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा,‍ किशोरीताई आमोणकर अशा दिग्गज कलावंतांनी हा महोत्सव एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवला आहे. गेल्या 25 वर्षाचा हा अनमोल ठेवा जतन केलेला असून काही वैशिष्ट्यपूर्ण ‍ दुर्मिळ मैफिली यंदाच्या स्मरणरंजन सोहळ्यामुळे रसिक आणि अभ्यासकांसाठी पर्वणी ठरतील. शनिवार 28 डिसेंबर रोजी सायं. 7 वाजता उस्ताद अक्रम खान यांचे ‘तबलावादन’ तर रात्री 8.30 वाजता पं. दिनकर पणशीकर यांचे ‘गायन’ होणार आहे. रविवार 29 डिसेंबर रोजी सायं. 5 वा. अखिल भारतीय नाट्यपरिषद, ठाणे शाखा ‍निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’ तर रात्री 9 वाजता बहाउद्दीन डागर यांचे ‘रुद्रवीणा’ वादन सादर केले जाणार आहे. शनिवार 30 डिसेंबर रोजी सायं. 7 वाजता गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या सांगितिक व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा ‘म्हारो प्रणाम’ हा कार्यक्रम सादर होणार असून मंगळवार 1 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता पं. रामनारायण यांचे ‘सारंगीवादन’ सादर केले जाणार आहे. जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. दिनकर पणशीकर यांचे याच महिन्यात दुर्देवी निधन झाले. त्यांनी 12 वर्षापूर्वी पं. राम मराठे महोत्सवात सादर केलेल्या अनवट रागाच्या मैफिलीच्या पुन:प्रत्ययाने त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यात येणार आहे. चार दिवसांची ही स्मरणरंजन मैफल Pt.Ram Marathe Sangeet Mahotsav, Thane या फेसबुक पेजवर विनामूल्य पाहता येणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. सद्यस्थितीत राज्यशासनाने नाट्यगृहे उघडण्यास परवानगी दिली असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा महोत्सव यंदा नाट्यगृहात घेणे शक्य होणार नाही. या महोत्सवाला होत असलेली रसिक ठाणेकरांची गर्दी लक्षात घेवूनच यंदा फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुढच्या वर्षी हा महोत्सव त्याच उत्साहात साजरा केला जाईल असेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading