संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाची उद्यापासून मेजवानी

ठाणे महापालिकेच्या वतीने उद्यापासून संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता या महोत्सवाची सुरूवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे. गडकरी रंगायतन येथे 2 ते 4 डिसेंबरपर्यत हा महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. उद्या सायंकाळी 7.00 वा. ‘इंडीरुट्स’ या शास्त्रीय गायन वादनाने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. सायली तळवलकर आणि सहकलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. गेली 45 वर्षे कथ्‌थ्क या नृत्यप्रकाराची अतुलनीय साधना करुन आजवर कथ्थक नृत्याच्या अनेक शिष्या घडविणाऱ्या डॉ. मंजिरी देव यांना संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 51 हजार रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गेली 20 वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आणि 10 वर्षे अध्यापनाचे काम करीत संगीताची साधना करणाऱ्या दीपिका भिडे- भागवत यांना पं. राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 25 हजार रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्यानंतर बेगम परवीन सुलताना यांचे गायन होणार असून त्यांना शादाब सुलतान खान हे सहकलाकार म्हणून साथसंगत करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी विधा लाल यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण आहे. त्यानंतर शोभा चौधरी, अपर्णा केळकर, अविराज तायडे हे ठुमरी/ दादरा/ ठप्पा सादरीकरण करणार आहेत. तर रात्री तेजेंद्र मुजुमदार याचं सरोद वादन होणार आहे. तर रविवारी सकाळी निधी प्रभू यांचं कथ्थक नृत्य, कल्याणी साळुंखे (गायन), मुकूंद मराठे यांच्या गायनाची बहारदार मैफिल रंगणार आहे. दुपारी वर्षा जोगळेकर आणि सहकलाकार ‘सौभद्र’ संगीत नाटक सादर करणार आहेत. तर महोत्सवाची सांगता रात्री पं. शिवकुमार शर्मा यांना श्रध्दांजलीपर कार्यक्रमात पं. सतीश व्यास (संतूर वादन), पं. मुकूंदराज देव (तबला), विवेक सोनार (बासरी), अंबी सुभ्रमन्यम् (व्हायोलिन), राजेश श्रीनिवासन (मृदुंगम) यांची आगळी वेगळी मैफिल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading