श्रमजीवी संघटनेतर्फे हक्काग्रह आंदोलन

कोरोनाच्या संकटातही गरीब कष्टकरी बांधवांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळण्याचा त्यांचा हक्क मिळावा म्हणून श्रमजीवी संघटनेतर्फे हक्काग्रह आंदोलन करण्यात आले. आपल्या हक्कासाठी 50-50 लोक ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर एकत्र आले होते. शारीरिक अंतर आणि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अत्यंत शिस्तबद्धपणे हे अनोखे हक्काग्रह पाहायला मिळाले. सर्व तहसिल कार्यालयासमोर भयमुक्तपणे बसलेले हे बांधव आपला रेशनचा हक्क मागताना दिसले. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर राज्य शासनाने तातडीने रेशनकार्ड आणि धान्यासह इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, न्यायालयाला दिलेले हमीपत्र सरकारने तातडीने अंमलात आणावे, प्रत्येक मजुराला काम मिळावे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. आपण आपल्या मूलभूत हक्कासाठी ही लढाई लढत आहोत, लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेल्या प्रत्येक मार्गाचा अहिंसक आंदोलनाच्या आयुधांचा आपण यापूर्वी वापर केला, यापुढेही आपण ते करत राहू असे संस्थापक विवेक पंडित यांनी यावेळी कार्यकर्त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगितले. पोलीस यंत्रणेने गुन्हे दाखल केले तर त्यांना पूर्ण सहकार्य करत सकारात्मक प्रतिसाद द्या आपले नाव पहिला आरोपी म्हणून द्या असे सांगत पंडित यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले. लॉकडाऊनमुळे गरीब आदिवासी मजूर बांधवांवर उपासमार ओढवली. याबाबत श्रमजीवी संघटनेने सुरूवातीपासून मदत कार्याचा ओघ सुरू ठेवला लॉकडाऊन काळात संघटनेने 49 हजार पेक्षा जास्त लोकांना धान्य, तयार जेवण देण्याचे काम श्रमजीवी सारख्या गरिबांच्या संघटनेने उभारलेल्या सव्वातीन कोटी रुपयांच्या देणगीतून केले. मात्र यापुढेही अशीच मदत करण्यात श्रमजीवीला मर्यादा आहेत हे वास्तव आहे, मुळात या संकट काळात गरीबांना आधार देण्याची नैतिक आणि संविधानिक जबाबदारी ही शासनाची आहे. याबाबत अनेकदा पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून गरिबांच्या व्यथा मांडल्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. चार जिल्ह्यात तब्बल 18 हजार पेक्षा जास्त अर्ज दाखल आहेत, हे कार्ड तातडीने देण्याबाबत तसेच धान्यासोबतच जीवनावश्यक वस्तू देण्याबाबत कृतिशील निर्णय होईपर्यंत लढाई सुरू राहील असा निर्धार श्रमजीवींनी व्यक्त केला. चार जिल्ह्यात झालेल्या या हक्काग्रह मध्ये प्रत्येक तहसील कार्यालयात ज्यांचे हातावर पोट आहे असे सामान्य लोक एकत्र आले होते. मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत रोज असाच हक्काग्रह सुरू राहील असे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading