शेती उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनक करावे – पालकमंत्री

जिल्ह्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनक करावे. तसेच शेतीला पाणी मिळावे, यासाठी कृषि विभागाने पाण्याचे स्त्रोत शोधून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात झाली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. गेल्या वर्षी झालेल्या खरीप हंगामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच सन 2022-23 च्या खरीप हंगामाच्या नियोजनावर चर्चा झाली. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माहिती पुस्तिकेचे आणि पोस्टरचे प्रकाशन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. खेवारे येथे शाफ्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीला पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू केली. अशा तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त क्षेत्र पाण्याखाली येते. त्यामुळे जिल्ह्यात आणखी 12 ठिकाणी अशा प्रकारची योजना सुरू राबवावी. जिल्हा वार्षिक नियोजनच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यात माती परीक्षणासाठी फिरते परीक्षण वाहनासाठीही जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी पालकमंत्र्यांसह आमदार निधीतूनही मदत मिळेल. शेती किफायतशीर होण्यासाठी गट शेतीला प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच त्यांच्या मालासाठी विक्री व्यवस्थाही करण्यात यावी. विकेल ते पिकेल योजनेनुसार शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृषि विभागाने सहाय्य करावे. संत सावता माळी आठवडे बाजाराच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीसाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहसंकुलात जागा द्यावी. जेणेकरून नागरिकांनाही ताजी आणि स्वच्छ भाजी मिळेल. जिल्ह्यातील भेंडी उत्पादन वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. खरीप हंगाम 2022-23 चे नियोजन करताना शेतकऱ्याना जी बी-बियाणे आणि खते हवीत तीच बियाणे आणि खते मिळावीत, यासाठी प्रगतीशील शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाच्या योजनांची पोचवायला हव्यात. ठाणे जिल्ह्यात अनेक तबेले आहेत. तेथील शेणखताचा वापर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा कृषी अधिक्षक मोहन वाघ यांनी यावेळी 2022-23 या वर्षाचे खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. 2021 मधील नैसर्गिक आपत्तीतील नुकसान ग्रस्तांना 1 कोटी 79 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षी 75 टक्के पिककर्ज वाटप झाले आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 13 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती वाघ यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading