शासन पालिकांच्या पाठीशी, पण हलगर्जी नको – मुख्यमंत्री

शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले. तसेच पावसाळी आजार, खड्डे, रस्ते कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असतांना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या सर्वांना मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे. वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे. ठाणे मुंबईला लागून आहे. गेले काही महिने सातत्याने कोरोनावर लक्ष दिले गेले परंतू आता आपल्याला इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी काळात विविध धर्मिय सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी सागितले. कोरोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवुन रुग्णांवर उपचार करावे. तसेच कोराना रुग्णावर उपचार करतांना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. कोरोना बरा झालेल्या रुग्णांशी यंत्रणांनी एक महिना संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस कोरोनाची लक्षणे बदलत आहेत. लक्षणे विरहीत रुग्णांवर बारकाईने लक्ष द्यावे असेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले. यंत्रणेचे तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवावी. रुग्णाला व्हेंटीलेटरपेक्षा ऑक्सीजनची आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सीजनची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना उपचाराबाबत शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी असेही त्यांनी सांगितले. सर्व महापालिकांच्या मागे शासन ठाम आणि खंबीरपणे उभे आहे. मात्र प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करुन प्रत्येक पालिकेने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातुन प्रभावीपणे काम करावे असे त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर औषध नाही म्हणून लोक घाबरत आहेत. डॉक्टर-रुग्ण-औषधे यांची गाठ वेळेत होणे आवश्यक आहे. जनतेमध्ये कोरोना विषयी आजही गैरसमज आहेत. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करुन हे संक्रमाण नियंत्रणात ठेवायचे आहे. प्रयत्न करताना स्वत:ची आणि कुटुंबाचीही काळजी घ्या असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कळवा येथे म्हाडाच्या सहकार्याने उभारलेल्या 1100 बेडच्या कोरोना सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या शिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 20 रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading