वीज बीलांची थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा महावितरणचा इशारा

वीज ग्राहकांना वीज बीलाची थकबाकी भरण्याचं आवाहन महावितरणनं केलं असून थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे. राज्यामध्ये डिसेंबर अखेर ६३ हजार ७४० कोटी रूपयांची वीज बीलांची थकबाकी असून यामुळं महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. राज्यातील कृषी ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी रूपयांची थकबाकी आहे. तर वाणिज्यिक, घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांकडे ८ हजार ४८५ कोटी रूपयांची थकबाकी आहे. लॉकडाऊनमध्ये वीज पुरवठा खंडीत न करण्याचा निर्णय महावितरणनं घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांना वीज बील सुलभ हफ्त्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणनं दिली आहे. थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णयही महावितरणनं घेतला आहे. सध्या थकबाकीमुळे महावितरणला बँकांची आणि इतर देणी तसंच कर्मचा-यांचं वेतन देणंही अशक्य झालं आहे. त्यामुळं थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहिम राबवली जात असून थकबाकी वसुलीत कसूर करणा-या अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाईचे संकेत महावितरणनं दिले आहेत. वीज बीलाचा भरणा करून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading