वाय बाईटस् च्या माध्यमातून ऑनलाईन अन्न मागवणार्‍यांना साधता येणार परमार्थ

ऑनलाईन जेवण मागवणा-यांची क्षुधा शांती होत असतानाच आता रस्त्यावर राहणाऱ्या भुकेल्या जीवांच्याही पोटात दोन घास पडावेत, या उद्देशाने ज्ञानदेव बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी “वाय बाईट्स” हे अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून अन्नचळवळ सुरू करण्यात येणार आहे. या अॅपचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अनिल भांगले हे गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदेव बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. या संस्थेचा मुख्य उद्देश हा “भुकेल्या पोटाला दोन घास” हाच आहे. त्या दृष्टीकोनातून अनिल भंगाळ हे दररोज 200 जणांना जेवण पुरवत असतात. या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे आणि सर्वसामान्य नागरिकांचा चळवळीत सहभाग वाढावा, यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वाय बाईट्स नावाचे अॅप सुरू केले आहे. या अॅपशी ठाण्यातील 100 हॉटेल्सनी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपच्या माध्यमातून एका व्यक्तीने अन्न मागवल्यानंतर एका भुकेल्या माणसालाही अन्न देण्यात येणार आहे. त्याची माहितीही संबधित ऑर्डरकर्त्याला दिली जाणार आहे. हे अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. सध्या खुप सारे अॅप असले तरी सामाजिक उद्देश ठेवून काम करणारे हे पहिलेच ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅप आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने सुरू केलेली ही अन्नचळवळ वाढविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या अॅपला ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. तर संजय केळकर यांनी या अॅपमुळे भुकेल्या जीवाला अन्न मिळणार आहे. त्यामुळेच ठाणेकरांनी हे अॅप आपल्या फोनमध्ये घेऊन गरीबांना जेऊ घालावे असे आवाहन केले. भुकेल्यांच्या पोटाला दोन घास ही संकल्पना घेऊन सुरू केलेले हे अॅप रिकाम्या हातात पुस्तक आणि आजारी माणसाला औषध ह्या संकल्पनेवर काम करणार असून शिक्षण आणि मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचा आपला मानस असल्याचं भांगले यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading