राज्यातील 50 हजार गोविंदांना
10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण

दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली विमा संरक्षणाची मागणी त्यांनी तातडीने मार्गी लावल्याबद्दल मुंबई, ठाण्यासह राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात दहीहंडी उत्सव तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते. या उत्सव आणि स्पर्धेत हजारो गोविंदा आणि गोपिका सहभागी होत असतात. दहिहंडी हा साहसी खेळ असल्याने तो खेळताना गोविंदांना अपघात होतात, रुग्णालयात दाखल करुन वैद्यकीय उपचारांची गरज पडते. प्रसंगी गोविंदांचा मृत्यूही ओढवतो. अशा परिस्थितीत गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यंदाही मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 11 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्याच्या आतंच कार्यवाही पूर्ण झाली आणि 18 ऑगस्ट रोजी गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याचा शासननिर्णय, क्रीडमंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील क्रीडा विभागाने जारी केला.

या शासननिर्णयामुळे, दुर्दैवाने एखाद्या गोविंदाचा खेळताना अपघाती मृत्यू झाला किंवा त्याचा दोन अवयव किंवा दोन्ही डोळे गमवावे लागले तर, त्याच्या कुटुंबियांना किंवा त्याला 10 लाखांची मदत मिळणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास 5 लाखांची मदत मिळणार आहे. कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 10 लाखांची मदत मिळणार आहे. अंशत: अपंगत्व आल्यास निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार मदत मिळणार आहे. गोविंदांचा 1 लाख रुपयांपर्यंतचा रुग्णालयातील उपचारांचा खर्चही विमा संरक्षणातून केला जाणार आहे. सदर विमा संरक्षणाचा लाभ राज्यातील 50 हजार गोविंदांना होणार असून, त्यासाठी लागणारा प्रत्येकी 75 रुपयांप्रमाणे 37 लाख 50 हजार रुपयांचा विमा हप्ता महाराष्ट्र राज्य दहिहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. समितीला तशी परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात दहिहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. गोविंदा मंडळातील तरुण महिनाभर आधीपासून मानवी मनोऱ्यांचा सराव करत असतात. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा विचारात घेऊन गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा आणि त्यासंदर्भातील सुरक्षिततेची नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहिहंडी पथकांना विमासंरक्षण मिळावे, आयोजनावरील जाचक अटी शिथील कराव्यात, गोविंदा उत्सवाची वेळ मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाढवावी, दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, गोविंदा पथक व आयोजकांवर याआधी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्या गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी आणि चर्चेदरम्यान केल्या होत्या. त्यापैकी विमा संरक्षणाची पहिली आणि महत्वाची मागणी मान्य झाली आहे. उर्वरीत मागण्याही मान्य होतील, असा विश्वास गोविंदा पथकांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री यांची भेट घेतलेल्या, तसंच विमासंरक्षण दिल्याबद्दल आभार मानलेल्यांमध्ये, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे, गोविंदा पथकांचे प्रमुख पदाधिकारी अरुण पाटील (प्रमुख प्रशिक्षक, माझगाव ताडवाडी गोविंदा पथक), कमलेश भोईर (अध्यक्ष, यंग उमरखाडी गोविंदा पथक), संदीप ढवळे (प्रमुख प्रशिक्षक, जय जवान गोविंदा पथक), समीर पेंढारे (सल्लागार, सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव खोपट ठाणे), निलेश वैती (अध्यक्ष, जतन गोविंदा पथक), रोहिदास मुंडे, (अध्यक्ष, एकविरा आई गोविंदा पथक दिवा), नितीन पाटील (सल्लागार, आई चिखलादेवी गोविंदा पथक-कोपरी), अजित यादव (प्रशिक्षक, बेस्टचा राजा गोविंदा पथक-परेल), संदीप पाटील (अष्टविनायक गोविंदा पथक), किरण जमखंडिकर (धारावीकर आर्यन ग्रुप), अतुल माने (गावदेवी गोविंदा पथक, नालासोपारा), विवेक कोचरेकर (कोकणनगर गोविंदा पथक), आप्पा जाधव (संस्कृती गोविंदा पथक) आदींसह अनेक गोविंदांचा समावेश आहे.
०००००००००००००

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading