येऊर वनक्षेत्रातील मादी बिबट्याच्या मृत्यमागे काहीही संशयास्पद नाही

पाचपाखाडी राखीव वन सर्व्हे क्रमांक- 521, वनखंड क्रमांक- 1144 येथे मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीच्या मृत्यूनंतर केलेल्या शवविच्छेदनात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याची माहिती येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक (उत्तर) उदय ढगे यांनी कळविली आहे.

25 नोव्हेंबर 2022 रोजी, सकाळी 11.00 वाजता पाचपाखडी राखीव वनक्षेत्रात कर्मचारी फिरतीवर असताना अंदाजे 4 ते 5 वर्षे वय असणाऱ्या मादी बिबटचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच मानद वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन, मृत बिबट मादीच्या शवाच्या परिसराचा पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा नोंदविला. बिबट्याची नखे, दात व इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले. प्रथमदर्शनी बिबट्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असल्याचे दिसून आले.

मृत बिबट मादीचे शव शासकीय वाहनाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथील पुशवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेण्यात आले. या बिबट मादीच्या शवाचे शवविच्छेदन वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, मानद वन्यजीव रक्षक यांच्या उपस्थितीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी व मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. बिबटयाच्या शरीरातील महत्वाच्या अवयवांचे नमुने तपासणीकरीता राखून ठेवण्यात आले व तपासणी करीता मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट मादीच्या शवास अग्नी देण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार मृत्यूमध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नसल्याचे  ढगे यांनी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading