यावर्षी नवरात्र आठ दिवसांचे – दा. कृ. सोमण

यावर्षी गुरुवार ७ ॲाक्टोबर रोजी नवरात्रारंभ- घटस्थापना आहे. यावर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने यावर्षी नवरात्र आठच दिवसांचे आले आहे. आठव्या दिवशी गुरुवारी १४ ॲाक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आहे. त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या सर्व सण- उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रकाप्रमाणे करण्यात आली आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेशपूजन केले जाते. त्यानंतर भाद्रपद कृष्णपक्षात ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, जमीन- घर दिले त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येते म्हणून निसर्गातील निर्मितीशक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. हे विश्व १३.७ अब्ज वर्षांपूर्वी या निर्मितीशक्ती म्हणजे आदिशक्तीमुळेच निर्माण झाले. शेतातील रोपांवर धान्य तयार होते तेही या निर्मिती म्हणजे आदिशक्तीमुळेच ! नवीन पिढी जन्माला येते तीही या निसर्गातील निर्मितीशक्तीमुळेच ! म्हणून नवरात्र उत्सव हा या निर्मिती म्हणजे आदिशक्तीचा उत्सव असतो. नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का असतो ? नऊ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो. आपल्या ऋषीमुनीनी सण-उत्सवांची रचना करतांना विज्ञानाचा किती बारकाईने विचार केला होता ही गोष्ट आपल्या लक्षात येते. दा. कृ. सोमण यांनी नवरात्रातील रंग सांगितले आहेत. गुरुवार ७ आक्टोबर पिवळा, शुक्रवार ८ आक्टोबर हिरवा, शनिवार ९ आक्टोबर ग्रे, रविवार १० आक्टोबर केशरी, सोमवार ११ आक्टोबर सफेद, मंगळवार १२ आक्टोबर लाल, बुधवार १३ आक्टोबर निळा, गुरुवार १४ आक्टोबर गुलाबी रंग आहे. नवरात्र उत्सव हा महिलांच्या सबलीकरणाचा असतो. महिला सामर्थ्यवान व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश असतो. अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये यावी हा नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचा हेतू असतो. नवरात्रात कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हे कुठल्याही धर्मग्रंथात सांगितलेले नाही. परंतु नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक, सांस्कृतिक असतो. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्यात समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने प्रत्येकीला आनंद होत असतो. इथे वस्त्र किती किंमतीचे आहे हा प्रश्न नसतो. केवळ रंगाने एकता निर्माण होत असते. त्याच रंगाचे वस्त्र परिधान केले नसले तरी पाप लागत नसते, किंवा नेसले तर पुण्य मिळत नसते ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी आहे. उत्सव हे आनंदप्राप्तीसाठीच असतात. हे रंग वारांवर ठरविले जात असतात असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading