म्हाडा सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एनए कराचा प्रश्न राष्ट्रवादीमुळे मार्गी लागला

म्हाडा सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एनए कराचा प्रश्न राष्ट्रवादीमुळे मार्गी लागला. पाचपाखाडी, सावरकर नगर येथील म्हाडाच्या सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एन ए कराचा प्रश्न मार्गी लावत या करांवरील व्याज आणि दंड माफ करुन या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे. मात्र, येथील नागरिकांचे लीज रेंट आणि अकृषीकर कराचा प्रश्न आपण मार्गी लावल्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी अमीत सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी प्रचंड पाठपुरावा  केला होता. मात्र, दुर्देवाने नाच ना जाने अंगण तेढा याप्रमाणे राष्ट्रवादीचे काम, श्रेय राष्ट्रवादीचे मात्र लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग दिलीप बारटक्के यांच्याकडून केले जात आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.
पाचपाखाडी, सावरकर नगर भागामध्ये म्हाडाच्या 110 सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या जमिनीची मालकी अद्यापही म्हाडाकडे आहे. तसेच, स्थानिक नागरिक एनए कर भरण्यास तयार आहेत. मात्र, त्यावर तसेच लीज रेंटवर व्याज आकारण्यात येत असल्याने नागरिकांना ही रक्कम भरणे त्रासदायक ठरत होते. ही बाब स्थानिक नागरिकांनी अमीत सरैय्या यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरैय्या यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न निकाली लावला आहे. मात्र, याचे श्रेय सेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे घेत असल्याने स्थानिक नागरिकांसोबत परांजपे आणि अमीत सरैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन या मागील वस्तूस्थिती उघडकीस आणली.  म्हाडाच्या 110 सोसायट्यांच्या जमिनीची मालकी म्हाडाकडेच आहे. शिवाय, येथील नागरिकांना एनए कर भरावयाचा असूनही त्यावर आकारण्यात आलेल्या दंडात्मक व्याजामुळे नागरिकांनी कोंडी झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण गेले 3 वर्षे प्रयत्न करीत होतो. आव्हाड यांनीच लीज रेंट आणि एन ए करावरील व्याज-दंड माफ केला आहे. आता केवळ नागरिकांना मुद्दल अदा करावे लागणारे आहे.  सावरकरनगरसाठी केलेल्या पाठपुराव्याचा लाभ शहरातील म्हाडा वसाहतींना झाला आहे. त्यातून म्हाडाचे सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरगरीबांना फायदा व्हावा, या उद्देशाने जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतला असतानाही शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी पत्रके वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांना आम्ही खुले आव्हान देतो की, म्हाडाच्या 110 सोसायटयांचा प्रश्न कोणी मार्गी लावला; त्यासाठी कितीवेळा बारटक्के म्हाडा कार्यालयात गेलात? किती अधिकार्‍यांशी बारटक्के बोलले? ही प्रक्रिया कशी होती? कितीवेळा नागरिकांच्या बैठका घेतल्या? याचे पुरावे दिलीप बारटक्के यांनी सादर केले तर आपण राजकारण सोडू. मात्र,  असे पुरावे सादर करता आले नाही तर बारटक्के यांनी जाहीर माफीनाम्याचेही पोस्टर्स लावावेत, असे आव्हानही अमीत सरैय्या यांनी दिले आहे. या पूर्वी असे दुसर्‍याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती. मात्र, नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसर्‍याचे श्रेय घेण्याची संस्कृती वाढीस लागली आहे. काम दुसर्‍याचे आणि बॅनर स्वत:चा लावायचा, असे प्रकार ते करीत आहेत.  कलियुगातील नारद आहेत ते असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading