मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू

युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. २०१५ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ करीता अर्ज करण्यासाठी वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव, असे किमान निकष आहेत. ऑनलाइन परीक्षा, निबंध आणि मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती संकेतस्थळावर अथवा ८४११९६०००५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading