मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील गुरूद्वारामध्ये जाऊन घेतलं दर्शन

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५३वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरूनानक जयंतीनिमित्त ठाण्यातील गुरूद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरूनानक साहेब यांचा जन्म कलवंडी इथे झाला. आता हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे. गुरूनानक जयंतीनिमित्त गुरूद्वारामध्ये गुरू ग्रंथ साहेबचं पठण तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून शीखांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या गुरू ग्रंथ साहेब या ग्रंथाचं अखंड वाचन केलं जात होतं. १४३० पानांच्या या ग्रंथात हिंदूंचे १३, शीखांचे ७ आणि मुस्लिम धर्मियांचे ५ अध्याय आहेत. संत रामदास स्वामी, संत नामदेव, संत कबीर या संतांच्या रचनांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. श्री गुरूनानकजी यांनी सदैव मानव कल्याणाचा विचार केला. त्यांच्या या विचारांचे प्रकाश पर्व निर्माण व्हावे आणि त्यातून आपल्या सर्वांचे जीवन उजळून निघावं, अशा शुभेच्छा त्यांनी जमलेल्या शीख बांधवांना दिल्या. श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना संकटकाळात लंगरच्या माध्यमातून शीख बांधवांनी केलेली मानवसेवा अभिनंदनीय असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading