मिले सूर मेरा तुम्हारा नवदाम्पत्य संमेलन उत्साहात संपन्न

ठाण्यातील आयुर्वेद व्यासपीठ ही संस्था त्यांच्या विविध आयमांपैकी एक आयाम -वसुधैव कुटुंबकम – या अंतर्गत कुटुंब सुखी आणि आनंदी राहण्यासाठी प्रयत्नशील असते. कुटुंब प्रबोधन गतिविधी – ठाणे जिल्हा आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मिले सूर मेरा तुम्हारा हे नवदाम्पत्य संमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. भारतीय कुटुंब व्यवस्था सम्पूर्ण जगभरात आदर्शवत मानली जाते. प्राचीन काळापासून भारतावर झालेल्या असंख्य आक्रमाणांनंतरही हिंदू संस्कृती प्रवाहित आणि अक्षुण्ण राहण्याचे सम्पूर्ण श्रेय भारतीय कुटुंब व्यवस्थेलाच दिले जाते. सद्यस्थितीतही मूर्त अथवा अमूर्त स्वरूपातील होणाऱ्या कोणत्याही आक्रमणांचा निःपात करून संस्कृती प्रवाहित ठेवण्याची क्षमता भारतीय कुटुंब व्यवस्थेत निश्चितपणे आहे.कुटुंब व्यवस्था आणखी सबळ होण्याच्या दृष्टीने कुटुंबातील शालेय विद्यार्थी, युवा वयोगट, नवदाम्पत्य आणि ज्येष्ठ नागरिक या चारही घटकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुटुंब प्रबोधन गतीविधितर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमात खेळाद्वारे प्रबोधन या पहिल्या सत्रात नवदाम्पत्याना सहजीवनात आवश्यक असणारे काही संदेश मिळतील अशा खेळांचे आयोजन केले होते. दुसऱ्या सत्रात आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेच्या कार्यवाह वैद्य कीर्ती देव यांनी नवदाम्पत्याना आरोग्य आणि सुप्रजा निर्मितीसाठीचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात आशीर्वाद सायकोथेरपीक सेंटरच्या संचालिका,मनोचिकित्सक सुलभा माणकेश्वर यांनी सहजीवनातील सहसंवेदना, एकमेकांप्रति आदर,प्रेम,विश्वास,निष्ठा, कुटुंबातील सर्वांचा स्वीकार अशा मुद्द्यांवर नवदाम्पत्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचा समारोप करताना कुटुंब प्रबोधन गतीविधीचे कोकण प्रांत सहसंयोजक डॉ विवेकानंद वडके यांनी अखिल विश्वाला आदर्श वाटणारी भारतीय कुटुंब व्यवस्था अक्षुण्ण राखण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने नवदाम्पत्यांची आहे असे सांगतानाच आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपण राष्ट्रहिताचा विचार सर्वप्रथम करायला हवा असेही सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading