महाराष्ट्र स्पोर्टस क्लब संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं गणेशोत्सवाचं ५०वं वर्ष

मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी सणावाराची जी मूळ संकल्पना होती; ती फारच दूर गेली आहे. लोकांना मनोरंजनाची साधने आपल्या हातात मिळाली आहेत. तरीही, जनजागृती, स्थानिकांच्या कलागुणांना वाव देणे अन् लोकांना एकत्र आणण्याची जी मूळ संकल्पना होती त्या संकल्पनेला अनुसरुन उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्टस क्लब संचालित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेली 50 वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सव मंडळाची 1973 मध्ये जनार्दन वैती यांनी काही तरुणांच्या साथीने स्थापना केली होती. तेव्हापासून अखंडीतपणे हा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. वैविद्यपूर्ण आरास आणि देखाव्यामुळे या गणेशोत्सवाला दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात. यंदा या गणेशोत्सवाचे 50 वे वर्ष आहे. कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा न करता देखाव्यापेक्षा प्रबोधनात्मक आणि सांघिक कार्यक्रमांवर या गणेशोत्सवामध्ये भर दिला जात आहे. समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम गेले काही दिवस या मंडळाच्या वतीने राबविण्यात येत आहेत. गणरायाचे आगमन झाल्यापासून या मंडळाच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रमांवर भर दिला जात आहे. या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागण्यासाठी विज्ञानातून जादूचे प्रयोग 2 सप्टेंबर रोजी सादर करण्यात आले. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मंडळाच्या सर्वच सदस्यांनी रक्तदान केले. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निंबध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची संस्कृती नवतरुणांना उमगली पाहिजे, या उद्देशाने महाराष्ट्राची लोककला या कार्यक्रमाचे सादरीकरण दादूस आणि वेदांत जमागावकर यांनी केले. त्याशिवाय, मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम; ग्रामीण भागातील कलावंतांना मंच उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांची भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन या मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. गणेश विसर्जनाची अनोखी मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीमध्ये शिवरायांचा जिवंत इतिहास साकारण्यात येणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी यांनी सांगितले. हे मंडळ केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादीत राहिलेले नाही. या मंडळाच्या वतीने आजवर अनेक विधायक कामांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या मंडळाने कोविडच्या काळातही आपली सेवाभावी वृत्ती जोपासली आहे. वाडवडिलांनी लावलेले हे रोपटे आज तिसरी पिढी जोमाने सांभाळत आहे. या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करण्याची आमची संकल्पना असून या पुढे सामाजिक कार्यामध्ये हे मंडळ अधिक वेगाने कार्यरत राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading