महारक्तदान शिबीरात पहिल्याच दिवशी २३३७ बाटल्या रक्ताचे संकलन

कुठलीही गौरवशाली परंपरा सुरू करणे आणि ती त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असून शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाक्याच्या नवरात्रौत्सवाची गौरवशाली परंपरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवली आहे. महारक्तदान सप्ताहाच्या निमित्ताने या नवरात्रौत्सवाला नवे परिमाण लाभले असून ही खरी भक्ती आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीचे औचित्य साधून ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाला. या महारक्तदान सप्ताहाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी २३३७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शिवसेना ठाणे व पालघर जिल्ह्याच्या वतीने या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. टीएमटीच्या ३००हून अधिक कर्मचाऱ्यांनी पहिल्या तासाभरातच रक्तदान केले. याप्रसंगी एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि अभिनेते कुशल बद्रिके यांनीही रक्तदान केले. सध्या राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. त्यामुळे रुग्णांचीही परवड होत आहे. यंदा नवरात्रीचे औचित्य साधून महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा संकल्प सोडला आणि त्यानुसार महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचं शिंदे यांनी सांगितले. रक्तदान हे पुण्याचे काम आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते एकाच्या शरीरातून काढूनच दुसऱ्याला द्यावे लागते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील सुमारे ६५ ब्लड बँका या महारक्तदान सप्ताहात सहभागी झाल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading