महसूल विभागात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा द्यावा – जिल्हाधिकारी

महसूल विभागाच्या कामकाजात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करावे. त्याचबरोबर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने 40 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षापासून अधिकारी-कर्मचा-यांच्या जोडीदाराची देखील वैद्यकीय तपासणी केली जाईल असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हाधिका-यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना महसुल दिनाच्या शुभेच्छा देत महसुल विभाग काळानुरूप बदलतोय दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करतानाच स्वतासोबतच सामान्यांचे जगणे सुंदर करण्याचे आवाहन केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेऊन तंदुरुस्त राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. राज्य शासनाने 40 वर्षांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले आहे. ठाणे जिल्हा महसुल प्रशासनाने त्यासाठी ठाण्यातील एका रुग्णालयाच्या सहकार्याने ही आरोग्य तपासणी माफक दरात करून देण्याची सोय केली आहे. पुढील वर्षी अधिकारी कर्मचाऱ्याच्या जोडीदाराचीही आरोग्य तपासणी केली जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी निवडणूक ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला. महसुल दिनानिमित्त जिल्हा पुरवठा अधिकारी राजी थोटे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, राजाराम तवटे, जयराज देशमुख, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह सुमारे 66 उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी नावेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading