महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताहाचा जिल्ह्यात आयोजन

सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन *ठाणे,दि.28(जिमाका) :* राज्यभर दि. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत "महसूल सप्ताह" साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. या सप्ताहामध्ये नागरिकांनीही आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवून देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्या वेळी व वेळापत्रानुसार करणाऱ्या उत्कृष्ट अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दि.1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महसूल व वन विभागाच्या दि. 25 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सप्ताहात दि.1 ऑगस्ट रोजी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार करणे, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 खालील प्रकरणे तलाठ्यांमार्फत ई-हक्क पोर्टलवर सेतू सुविधा केंद्रामार्फत नोंदवून तहसिलदारांकडे पाठविणे. गाव तेथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, दि. 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद या कार्यक्रमामध्ये इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्रे देण्याबाबतचे प्रलंबित अर्ज निकाली काढणे. प्रमाणपत्र, दाखल्यांबाबतची आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहितीपर पत्रक प्रसिध्द करणे, दि.3 ऑगस्ट रोजी "एक हात मदतीचा" या उपक्रमाद्वारे नुकसानीबाबत पात्र नागरिकांना लाभ देण्याबाबतची कार्यवाही करणे, दि.4 ऑगस्ट रोजी "जनसंवाद" या उपक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करुन प्रलं‍बित असलेली प्रकरणे निकाली काढणे, दि.5 ऑगस्ट रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी" या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करणे, दि.6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे, आणि या महसूल सप्ताह उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी दि.7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभात सप्ताहातील विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती, विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन सांगता समारंभ आयोजित करणे, असे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने शासनातील अत्यंत महत्त्वाचा असा हा महसूल विभाग नागरिकांना देत असलेल्या विविध सेवांविषयी जनतेला माहिती होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading