मध्य रेल्वे आरपीएफ श्वान पथक- मध्य रेल्वेचे कॅनाईन हिरो

उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आधीच धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी, रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांची सुरक्षा याला मध्य रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

रेल्वे मालमत्तेच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले रेल्वे संरक्षण दल सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत करण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे आणि त्यापैकी एक म्हणजे श्वान पथक आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाकडे श्वान पथकाचा भाग म्हणून सुप्रशिक्षित स्निफर श्वानांची एक कार्यक्षम टीम आहे. असे २९ कॅनाईन हिरो असून त्यापैकी १८ बॉम्ब आणि स्फोटके शोधण्यासाठी तैनात आहेत, ४ अंमली पदार्थ शोधण्यासाठी आणि ७ गुन्ह्यांच्या तपासासाठी तैनात आहेत.

श्वान पथकातील धुर्वा, ऑस्कर, मॅगी, टीपू, डॅनी, जिमी, जिवा आणि बाँड हे काही सर्वात हुशार आणि सक्षम श्वान आहेत ज्यांनी स्फोटके, अंमली पदार्थ शोधण्यात मदत केली आहे. त्यांनी केवळ सुरक्षा कर्मचार्‍यांना मदत केली नाही तर फौजदारी प्रकरणासारखी अनेक समस्या सोडवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या श्वानांना माटुंगा, कर्नाक बंदर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण येथे असलेल्या विशेष केनेल्समध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना हेडकॉन्स्टेबल भरत जाधव, मितेश आंबेकर, कॉन्स्टेबल जेपी गायकवाड, बजरंग नागरगोजे, रवींद्र झांभे, एसजी गायकवाड आणि कॉन्स्टेबल सचिन गुप्ता, किशोर पवार, डीएस यादव, रामवीर सिंग, तानाजी कांबळे आणि योगेश मीना या हँडलर द्वारा प्रशिक्षित केले जाते.

यापैकी बहुतेक कॅनाइन हीरो लॅब्राडॉर आणि डॉबरमॅन आहेत, अलीकडे बेल्जियन शेफर्डची काही पिल्ले विकत घेतली गेली आहेत. वर्ष २०२२ मध्ये एकूण १४ कुत्र्यांची पिल्ले खरेदी करण्यात आली. त्यापैकी ८ लॅब्राडोर आणि १ डॉबरमॅनची पिल्ले मुंबई विभागाला देण्यात आली असून ५ बेल्जियन शेफर्ड्सपैकी ३ पुणे विभागाला आणि प्रत्येकी १ नागपूर व भुसावळ विभागाला देण्यात आली आहे. या कुत्र्याच्या पिल्लांचे संगोपन आणि त्यांना प्रशिक्षिण दिले जाईल, जेणेकरून विद्यमान पथकात असलेले श्वान निवृत्त होतील तेव्हा त्यांची जागा घेतील.

मध्य रेल्वेच्या या सुपर डॉग्सनी गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्य सरकारकडून मदत मागितल्यावर त्यांनी रेल्वेबाहेरही आपली क्षमता सिद्ध केली आहे. या श्वानांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर पदे आणि पदोन्नती दिली जाते.

रेल्वे मालमत्तेला आणि प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्यात त्यांचे योगदान हे “श्वान माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे” हे घोषवाक्य सिद्ध करते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading