मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी सुरु

भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी सुरु करण्यात आली असून १४८-विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे प्रांताधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी आसावरी संसारे यांनी डी.ए.व्ही पब्लिक स्कूल, कापूरबावडी, ठाणे महानगरपालिका माध्यमिक शाळा, मानपाडा या आणि इतर ठिकाणी मतदान केंद्रांची पाहणी केली. या मतदान केंद्र जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण आणि प्रमाणिकरण जास्तीत जास्त १ हजार ५०० मतदारांच्या आधारे करण्यात येणार आहे. मतदान केंद्र असलेल्या इमारती खराब झालेल्या किंवा मोडकळीस आलेल्या नाहीत, याची खात्री करण्यात येत आहे, अशी माहिती तहसिलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी आसावरी संसारे यांनी दिली आहे.
मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण प्रमाणीकरण करणे, दुबार / समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे इत्यादी, कामे करावयाची आहेत. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताना एका मतदान केंद्रांतर्गत जास्तीत जास्त १ हजार ५०० मतदाराच्या आधारे करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण मतदान केंद्र नियम पुस्तिका २०२० मधील तरतुदीनुसार करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताना एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि शेजाऱ्यांना एका भागामध्ये सूचीबद्ध करणे, मतदारयादी आणि मतदार ओळखपत्रातील पत्त्याचे एकसारखेपण राखणे, ही कामेही करण्यात येणार आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading