मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपासून संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत – दा. कृ. सोमण

उद्या सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत असल्याने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपासून संध्याकाळी ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत आहे. मकर संक्रांती ही अशुभ नसते. दिनमान वाढत जाणे हे अशुभ कसे असू शकेल ? त्यामुळे मकर संक्राती हा गोड सण असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. मकर संक्रांतीचा आणि कोरोना संकटाचा काहीही संबंध नाही. यावर्षी संक्रांत ही बव करणावर होत आहे. त्यामुळे वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. काही समाजकंटक संक्रांतीच्या नावावर अफवा पसरवतात परंतू त्यावर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका असे आवाहन सोमण यांनी केले. २१ डिसेंबर रोजी सूर्य ज्यावेळी सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून दिनमान वाढत जाते. परंतू आपली पंचांगे ही निरयन पद्धतीवर आधारलेली असल्याने निरयन मकर राशीत सूर्याचे प्रवेश केला त्या दिवशी मकर संक्रांती साजरी करीत असतो. मकर संक्रांती नेहमी १४ जानेवारीला येते हेही खरे नाही. मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. इसवीसन २०० मध्ये मकर संक्रांती २२ डिसेंबरला, १८९९ मध्ये मकर संक्रांती १३ जानेवारीला येत होती. २०८५ पासून मकर संक्रांती १५ जानेवारीला तर २१०० पासून १६ जानेवारीला येईल. ३२४६ मध्ये मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येईल असेही सोमण यांनी सांगितले. मकरसंक्रातीला तिळगूळ देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीत शरीरास आवश्यक असतात. तसेच तीळ हे स्नेह आणि गूळ हा गोडवा वाढविणारा असतो. या दिवशी सुगड म्हणजे सुघटात ऊस, बोरे, हरभरे, गहू वगैरे पदार्थ घालून दान देण्याची प्रथा आहे. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात म्हणून महिला काळ्या रंगाची वस्त्रे नेसतात. तसेच लहान मुले आणि नवीन लग्न होऊन सासरी आलेल्या महिलांना काळी वस्त्रे तसंच हलव्याचे दागिने घालून आनंदोत्सव साजरा करतात असं दा.कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading