भिवंडी मेट्रोच्या कारशेडसाठी जागा घेताना बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्याची मागणी

भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा संपादन करायची झाल्यास त्याचा मोबदला बाजारभावानं मिळावा अशी मागणी कोन गोवे संघर्ष समितीनं केली आहे. भिवंडी मेट्रो कारशेडसाठी कोन गोवे गावातील जागा संपादित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. १९७१ मध्ये औद्योगिक विकासाच्या प्रयोजनासाठी ही जागा आरक्षित करण्यात आली होती. पण त्याचा काही मोबदला शेतक-यांना देण्यात आला नाही. त्यामुळं या जमिनीवरील औद्योगिक विकास प्रयोजन हटवण्यासाठी बराच लढा द्यावा लागला. ४५ वर्षानंतर या लढ्याला यश आलं आणि वडिलोपार्जित जमिनी परत मिळाल्या असं संघर्ष समितीकडून सांगण्यात आलं. आता या जागेवर ढाबे, हॉटेल, छोटे उद्योग सुरू करण्यात आले आहेत. या जमिनी बिनशेती करण्यात आल्या असून काही जमिनींचा विकासही केला जात आहे. पण आता भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कारशेडसाठी जागा संपादित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. लोकहिताचा प्रकल्प असल्यानं जमिन देण्यास विरोध नाही. पण जमिनीसाठी बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा अशी मागणी कोन गोवे संघर्ष समितीनं केली आहे. शासनाला हे मान्य नसेल तर अन्य जागेचा विचार करावा असंही संघर्ष समितीनं म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading