भिवंडी दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

सामान्य माणसाला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणे ही न्यायालय तसंच वकिलांची जबाबदारी आहे. जिल्हा आणि तालुका न्यायालये ही न्याय व्यवस्थेचा गाभा आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला न्याय देण्याची महत्वाची भूमिका ही न्यायालये बजावत असतात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.
ठाणे जिल्हा सत्र न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, भिवंडी वकील संघटनेच्या वतीने
भिवंडी येथील दिवाणी न्यायाधीश आणि न्याय दंडाधिकारीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले. राज्य घटनेच्या उद्देशिकेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भिवंडी न्यायालय इमारतीच्या स्मरणिकेचे आणि ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या हस्ते न्यायालयाच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच इमारती च्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात समाजातील अनेक घटक हे आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणांमुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावत नाहीत. अश्या लोकांना न्याय देण्याचे काम सर्वसामान्य लोकांचे न्यायालय म्हणून ओळखली जाणारी जिल्हा, तालुका न्यायालये करतात. त्यामुळे त्यांना दुय्यम न्यायालय म्हणू नये. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी गेल्या ७५ वर्षात आपण काय मिळवायला हवं हे जाणून ते मिळविण्यासाठी कुठं कमी पडलो याचा विचार करायला हवा.
राज्यात गेल्या दहा वर्षात न्यायालयाच्या अनेक चांगल्या इमारती उभारल्या आहेत. परंतु अद्यापही न्याय व्यवस्थेसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. न्याय व्यवस्थेसाठी चांगल्या सुविधा दिल्यास जलद न्याय मिळेल. त्याच प्रमाणे माहिती तंत्रज्ञानाचा न्याय व्यवस्थेमधील वापर वाढविण्यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. त्यासाठी ठाणे जिल्ह्याने पुढाकार घ्यावा, असेही ओक म्हणाले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, नागरिकांना न्यायालयात कमीतकमी जावे लागेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. स्वामित्व योजनेमुळे न्यायालयातील खटले कमी होण्यास मदत होणार आहे. भिवंडी न्यायालयामधील डिजिटल ग्रंथालयासाठी खासदार निधीतून संपूर्ण मदत देण्यात येईल. तसेच येथे अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading