भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं – जिल्हाधिकारी

भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं अशी इच्छा असून यासाठी योग्य गाव सुचवल्यास जिल्हा प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलं आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रंथ उत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिका-यांनी ग्रंथ संग्रहालय परिसरातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन काही पुस्तकांची खरेदी केली. दुर्मिळ ग्रंथांचं प्रदर्शन पाहून ते प्रभावित झाले. अशा पुस्तकांचा ठेवा डिजीटल पध्दतीनं संग्राह्य केला पाहिजे असंही जिल्हाधिका-यांनी बोलून दाखवलं. भिवंडी वाचन मंदिर, ठाणे नगर, डोंबिवलीतील स्वामी समर्थ वाचनालय यांच्याकडील दुर्मिळ पुस्तकांविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली. ठाणे शहरात आज उड्डाणपूल, मोठे रस्ते, मेट्रो आपण पाहत आहोत मात्र ग्रंथ, साहित्य, कला संस्कृतीची जोपासना करणा-या संस्था पाहिल्या की वाटते हा शहराचा आत्मा आहे. महाविद्यालयीन जीवन ठाण्यात गेल्यानं मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वास्तूत आपण नेहमी यायचो. मात्र पुस्तकं आणि ग्रंथ खरेदी करू शकण्याएवढी आर्थिक क्षमता नव्हती. आज ग्रंथांची खरेदी करू शकतो हे भाग्यच आहे असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading