बूस्टर डोस देण्याबाबत महापालिकेची तयारी सुरू

येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुले, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेने याबाबतचे नियोजन केले असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुस्टर डोस दिले जाणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. बूस्टर डोस देण्यासंदर्भात ठाणे महापालिकेने केलेल्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील मुले, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांची एकूण संख्या लक्षात घेवून त्या दृष्टीने लसीकरण करण्याबाबतचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. राज्य शासनाकडून बूस्टर डोस देण्यासंदर्भात नियमावली प्राप्त होताच शहरात लसीकरण सुरू केले जाईल असेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून ठाणे शहरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू आहे. परंतु काही नागरिक हे परदेशातून आल्याची माहिती लपवित आहेत. तसेच परदेशातून आलेले नागरिक हे काही दिवसानंतर बाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे, त्या दृष्टीने खबरदारी म्हणून सोसायट्यांनी देखील परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती तात्काळ ठाणे महापालिकेस 8286405990 या क्रमांकावर किंवा coronacelltmc@gmail.com या ई-मेलद्वारे कळवावी जेणेकरुन या नागरिकांची तपासणी करणे सोईचे होईल. तसेच ज्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास अशा नागरिकांना शासन नियमाप्रमाणे विलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक राहिल, जो पर्यत या नागरिकांचा ओमायक्रॉनच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यत त्यांनी विलगीकरण केंद्रात राहून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading