बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असणारी भाऊबीज काल सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज. या दिवशी यमुनेनं आपल्या घरी यमाची म्हणजे भावाची पूजा केली आणि त्याला पंचपक्वान्नांचं जेवण जेवू घातलं. प्रसन्न झालेल्या यमानं बहिणीला वर मागायला सांगितला. त्यावेळी बहिणीनं दरवर्षी याच दिवशी माझ्या घरी जेवायला यायचं आणि जो भाऊ स्वत:च्या बहिणीच्या हातचं जेवेल त्याला तू सुखी करायचं असा वर यमाकडे मागितला. आपल्या भावाच्या आयुर्वृध्दीसाठी यमाची पूजा करण्याची प्रथा आहे. भाऊबीजेच्या दिवशी भावाची पूजा करण्यामागे फार मोठा अर्थ आहे. बीजेचा चंद्र हा कर्तृत्वाचा प्रतिक मानला जातो. आपला भाऊ हा बीजेच्या चंद्राप्रमाणे कर्तृत्ववान व्हावा अशी सदिच्छा बहिणीच्या मनात यामागे असते. भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जाऊन ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. यावेळी बहिणही भावाला औक्षण करते आणि भेटवस्तू देते अशी प्रथा आहे.