पार्कींग प्लाझा कोविड केंद्रातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमधील दोन ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महापालिकेतर्फे एमएमआर क्षेत्रात एवढ्या मोठ्या क्षमतेचा हा पहिलाच ऑक्सिजन प्लांट आहे. हा प्लांट कार्यान्वित झाल्याने या कोविड सेटरमधील ३०० बेड्सना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटर पूर्णतः स्वयंपूर्ण झाले आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची वाढती गरज लक्षात घेऊन पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास कंपनीच्या आवारात नवीन कोविड केअर सेंटर उभारण्यात आली होती. परंतु, ऑक्सिजन पुरवठ्याअभावी ही सेंटर्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता पार्किंग प्लाझा येथे उभारण्यात आलेला ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित झाल्यामुळे ठाणे शहरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. एअरॉक्स कंपनीने उभ्या केलेल्या या दोन्ही ऑक्सिजन जनरेशन प्लांटद्वारे प्रतिदिन ३५० सिलेंडर म्हणजेच ३.२ टन एवढा ऑक्सिजन निर्माण होणार आहे. या ऑक्सिजन प्लांटमध्ये प्रत्येक दिवशी ८५० लीटर ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे. हे प्लांट अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत उभे करण्यात आले असून त्याद्वारे निर्माण झालेला ऑक्सिजन पाइपलाइन द्वारे या कोविड केअर सेंटरमध्ये वापरण्यात येणार आहे. जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज प्रतिदिन ३०० मेट्रिक टन एवढी असून प्रत्यक्ष पुरवठा हा २०० मेट्रिक टन एवढाच होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभे करणे गरजेचे बनले होते. अशात ठाणे महानगरपालिकेने आपली गरज पूर्ण करण्यासाठी विक्रमी वेळेत हे २ प्लान्ट उभारून ते कार्यान्वित केलेले आहेत. आगामी काळात या दोन प्लांटशिवाय कळवा हॉस्पिटल, व्होल्टास कंपनी येथेही दोन प्लांट उभे करून शहरात ४ ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading