नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नाचा मुहुर्त ५ वाजून ३२ मिनिटांपासून ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत तर लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ८ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आलं आहे. साधारणपणे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी असतो. नरक चतुर्दशीला चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत शास्त्राप्रमाणे अभ्यंगस्नान केलं जातं. उद्या चंद्रोदय पहाटे ५ वाजून ३२ मिनिटांनी तर सूर्योदय ६ वाजून ३६ मिनिटांनी होणार असल्यामुळं यावेळेत अभ्यंगस्नान करावं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. शरिराला तेल, उटणे, अत्तर लावुन मसाज करुन गरम पाण्याने स्नान करण्याला अभ्यंग स्नान म्हणतात. अभ्यंग स्नान केल्यानं स्नायु बळकट होतात, त्वचा तेजस्वी होते असं सोमण यांनी सांगितलं. दिवाळीच्या उत्सवात वायू आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

यंदा कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी आली असल्यामुळे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी आलं आहे. लक्ष्मी-कुबेर पूजन हे प्रदोषकाळी केलं जातं. उद्या प्रदोषकाली आश्विन अमावास्या असल्यामुळे याच दिवशी प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३७ मिनिटांपर्यंत लक्ष्मी कुबेरपूजन करावयाचे आहे असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण करायचं असतं. अलक्ष्मीचं शस्त्र झाडू असल्यामुळं झाडूची पूजा केली जाते. झाडूची पूजा केल्यामुळं लक्ष्मी घरी येते आणि अलक्ष्मी घरातून निघून जाते अशी यामागे भावना असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. लक्ष्मीला स्वच्छता, प्रामाणिकपणा, नितीमत्ता अशा गोष्टी आवडतात. जिथे अशा गोष्टी वास करतात तिथे लक्ष्मी वास करते अशी कथा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading